बस, रेल्वे व गर्दीची ठिकाणे, राजकीय सभा, आंदोलने सुरु ! पण मंदिराची दारे बंदच !!

0
5
श्रावण महिन्यात तरी जिल्ह्यातील मंदिराची दारे उघडावी …..भक्तांची मागणी !!!

गिरीश पळसोदकर, खामगांव
वाढत्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन व वेगवेगळे निर्बंध लावले होते. त्यामुळे जिल्ह्यातील मंदिरे बंद करण्याचे आदेश गत एक-दिड वर्षापूर्वी प्रशासनातर्फे देण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व मंदिरे आजही कुलूपबंद आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी नुकतेच जिल्हाभर विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाया तसेच विविध संघटनांकडून शासनाकडे निवेदनाचा पाऊस पडला आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिव मंदिरासह अन्य मंदिराची दारे उघडण्यात यावी अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे. आता या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाविकांना नो एंट्री आहे.
जिल्ह्यातील मंदिर बंद असल्यामुळे भक्तांना दर्शनासाठी मुकावे लागत आहे. आजच्या घडीला कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर जिल्हा उभा आहे. त्यात येत्या ९ ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला आरंभ होत आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यात शिवभक्त महादेवाची भक्तीभावाने पुजाअर्चा करतात. जिल्ह्यात अनेक पुरातन महादेवाची मंदिरे आहेत. गतवर्षी श्रावण महिन्यात कोरोनामुळे शिव मंदिरे बंद होती. त्यामुळे शिवभक्तांना दर्शनापासून मुकावे लागले. आता जिल्ह्यातील अनेक तालुके कोरोनामुक्त झाले आहे. जे तालुके कोरोनामुक्त झाले नसतील त्या गावात फारसे रुग्ण आढळून येत नाहीत. यंदा श्रावण २९ दिवसाचा आहे. यात पाच सोमवार येतात. श्रावण महिना पोळ्याच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. कोरोनावर अंकुश लावण्यासाठी सरकारकडून अनेक नियम लादण्यात आले होते. त्या नियमांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन करण्यात आले. मंदिरे भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आली. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर भक्तांकडून मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मध्यंतरी काही दिवस मंदिराची दारे उघडण्यात आली होती. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने पुन्हा मंदिरे गत एक ते दिड वर्षापासून प्रवेशद्वार बंद करण्यात आली. ती आजपर्यंत बंदच आहेत. श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये जावून दर्शन घेण्याची जिल्ह्यातील अनेक भक्तांनी ईच्छा प्रगट केली आहे. सद्यस्थितीत मंदिराच्या बंद प्रवेशदाराचे दर्शन घेवून भाविक घरी परतत आहेत. श्रावण महिन्यात मंदिरे उघडून दर्शनासाठी शासन व प्रशासकीय स्तरावर परवानगी देण्यात यावी अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात अधिक प्रमाणात शिव मंदिर आहेत व भक्तांची संख्या अधिक आहे. रेल्वे, बसेस आदी गर्दीची ठिकाणे उघडण्यात आली आहेत. मात्र मंदिरे बंद का? असा प्रश्‍न भक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
– ९ ऑगस्टपासून श्रावण मास प्रारंभ–
यंदा ९ ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. गतवर्षी कोरोनामुळे शिव मंदिरासह अन्य मंदिरे बंद होती आणि भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री होती. आजही तीच परिस्थिती आहे. केवळ मंदिराचे पुजारी मुर्तीची पुजाअर्चा करीत आहेत. श्रावण महिना जवळ येत आहे. तर यंदा श्रावण महिन्यात भक्तांसाठी मंदिराची दारे उघडली तर व्यवसायिकांचे थांबलेले अर्थचक्र पुर्ववत सुरु होईल. प्रशासनाने या व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

-जिल्ह्यातील प्रमुख देवस्थाने–
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर, देऊळगावराजा येथील बालाजी मंदिर, मेहकर येथील सारंगधर बालाजी मंदिर, चिखली येथील रेणुका माता मंदिर, घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर तसेच जिल्ह्यात हेमांड पंथी मंदिरे मोठया प्रमाणात आहेत.
…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here