
अमरावती जिल्हा प्रतिनिधी, जगदिश न्युज
जिल्हातील नांदगाव खंडेश्वर घटनेनुसार आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःकडेही लक्ष देण्याइतपतही वेळ मिळत नाही. इतका माणूस आपल्या कामांमध्ये व्यस्त बनला आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या एखाद्या वस्तूकडे लक्ष देणे तर दुरच आहे. परंतु अशीही काही उदाहरणे पाहायला मिळतात की, त्यामुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचा साक्षात्कार होतो.
काल अशीच घटना घडली, पोलिस भरतीची तयारी करित असलेला शिवरा येथील रहिवासी शुभम पवार हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा येथुन दुचाकी ने अमरावती ला महत्वाची ओरिजनल कागदपत्रे घेऊन गेला होता. मात्र बडनेरा ला पोहचताच त्याच्या लक्षात आले की, आपली सर्व ओरिजनल कागदपत्रे असणारी बैग ही वाटेतच पडली. त्यानंतर त्याने काही अंतरावर परत येवून हरवलेल्या बैगीचा शोध घेतला. मात्र बैग मिळाली नाही. बैग मध्ये त्याचे सर्व शालेय ओरिजनल दाखले, व अनेक वर्षांपासून जमवत आलेली इतर सर्व ओरिजनल कागदपत्रे त्या फाईलमध्ये असल्याने त्याची चिंता आणखीनच वाढली. हताश होऊन आता पुढे काय? आता परत नविन ओरिजनल कागदपत्रे बनवावे लागेल. असा विचार करत तो पुर्व तयारी म्हणून मंगरूळ चव्हाळा पोलिस स्टेशन मध्ये ओरिजनल कागदपत्रे हरवलेल्याची तक्रार दाखल करित होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला आणि पुढील व्यक्तीचे संभाषण ऐकून त्याच्या चेहऱ्यावरची चिंता मिटून एकदम प्रसन्नतेचे भाव दिसू लागले.
समोरील बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव पत्रकार सागर सव्वालाखे असल्याचे सांगत तुमची कागदपत्रे नांदगाव खंडेश्वर येथील व्यापारी प्रदिप नांदवीकर व त्यांचे सहकारी शंकर मुके यांना माऊली चोर ते जसापूर रस्त्यामध्ये सापडली असून तुमचा नंबर शोधून आम्ही फोन केला असल्याचे व ते सध्या त्यांच्या नांदगाव खंडेश्वर येथे असल्याचे सांगितले. हा फोन ऐकताच शुभम पवार याच्या जीवात जीव आला आणि त्याने पत्रकार सागर सव्वालाखे यांच्या येथे जाऊन आपली हरवलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. आज समाजात अश्याच स्वयंसेवकांची निश्चित गरज आहे जे इतरांचे दुःख हे स्वतःचे दुःख समजून समाजाची सेवा करतात.