
चंद्रपूरात येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय !!
बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज) मोझरी च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार सौ. पुष्पाताई बोंडे यांची तर उपाध्यक्ष पदी माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. २९ मार्च २०२२ रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक चंद्रपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यात यावे या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेल्या संसदीय संघर्षाला यश प्राप्त झाल्यानंतर जेव्हा श्री गुरुकुंज आश्रम मोझरी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या गादीवर बसायचे त्या गादीवर सन्मानपुर्वक बसविण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाशी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध आले. गुरुदेव भक्तांच्या अनेक मागण्यांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिका-यांनी आ. मुनगंटीवार यांना आजिवन विश्वस्त म्हणून नियुक्त केले. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने मरणोत्तर सन्मानीत करण्यात यावे या गुरुदेव भक्तांच्या मागणीचा ते सातत्याने पाठपुरावा करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील आ. मुनगंटीवार यांची श्रध्दा, गुरुदेव भक्तांसाठी असलेला जिव्हाळा यातुन आ. मुनगंटीवार यांचे गुरुकुंज मोझरीशी दृढ नाते निर्माध्ण झाले आहे.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार सौ. पुष्पाताई बोंडे आणि उपाध्यक्षपदी आ. सुधीर मुनगंटीवार यांची निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाने दोघांचेही अभिनंदन केले. यापुढील काळातही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातुन वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य आपण श्रध्दापुर्वक करु असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.