कृपया शेतकऱ्यांची हालअपेष्टा थांबवा !🙏🏻

0
40

विजय पोहनकर बोलतोय..!
भ्रमणध्वनी 9579141618

कृषी प्रदान देश म्हणून जागतिक डंका आपण मोठ्या तोऱ्यात वाजवतो.जगाचा पोशिंदा म्हणून फक्त बोलघेवडे शब्द प्रयोग करीत त्या शेतकरी, शेतमजूर मायबापाला वाऱ्यावर सोडत आहोत,हेच अंतिम सत्य असल्याने आज विनाकारण शेतकरी प्रशासकीय कामात होरपळून निघत आहे.

वाचक मित्रांनो! दरवर्षीप्रमाणे पिककर्ज हा विषय नित्याचा आहे.आता ह्यात गंमत म्हणजे पीककर्ज घेतांना शेतकरी वर्गाला होणारा बँकिंग क्षेत्रातील विद्वान लोकांचा त्रास बघा. पीककर्ज देतांना बँक मागत असलेली कागदपत्रे ही डोक्याला ताप देणारी आहेत,उगाच मनःस्ताप करून देणारी.मुळात 7/12 ,8अ,आधार कार्ड हीच कागदपत्रे मागायला हवीत.बँक मागते काय?
7/12 ,8अ, फेरफार,3 शंभर रुपये स्टॅम्प,100 रुपये स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र दुसऱ्या बँकेचे कर्जदार नसल्याचे, आधार कार्ड,मतदान कार्ड,पॅन कार्ड,2 फोटो,2 कोर्ट पावती,बँक पासबुक झेरॉक्स आता हा मनःस्ताप नव्हे का? डिजिटल युगात आधार कार्ड अपडेट केल्या बरोबर तुम्ही कोणत्या बँकेचे कर्जदार आहात हे स्पष्टपणे जाहीर होत.मग 100 रुपये च्या स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र घेणे म्हणजे विनाकारण शेतकरी वर्गाला वेठीस धरीत आर्थिक भुरदंड देणे होय.हा नियम बनविणारा अधिकारी किती विद्वान असेल ह्याचा अभ्यास करावा लागेल.आधार कार्ड घेतल्यावर मतदान कार्ड ची छायांकित प्रत घेणे म्हणजे वृक्ष तोडीला खतपाणी घालणे होय.उगाच कागदांवर खर्च करीत ही कागदपत्रे धूळखात पडलेली असतात.पीककर्ज हे सुलभ,सहजपणे भेटणारे असावे.मुळात डिजिटल युगात शेतकरी वर्गाला बँकेत चकरा मारणारी प्रणाली बंद झाली पाहिजे.शेतीची कामधंदे बंद करून बँकेच्या शेतकरी वर्गाला फेऱ्या मारायला लावणे म्हणणे त्याचा मानसिक छळ करणे होय. अश्या विषयावर शेतकरी बापाला मतदान मागणाऱ्या राजकीय पक्षांनी आंदोलन उभी करून पीककर्ज सुलभ कसे होईल ह्यावर काम केले पाहिजे.जात-धर्म हे तर तुम्ही आम्हाला सोडू देणारच नाही.त्यावर वाटेल तेवढे राजकारण करा.मात्र,माझा शेतकरी बाप साधं सोपं सुखकारक जीवन व्यतीत कसा करेल ह्यावर सुद्धा लोकसभेत-विधानसभेत ओरडत जा.शेतकरी वर्गाला 5स्टार जीवनाची अपेक्षाचा मुळीच नाही,भैतिक सुख त्याच्या नशिबी नाहीच मात्र सहजपणे जीवन जगता आले पाहिजे एवढं तरी करा.जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्याच पोटात काटे भरू नका.उगाच शब्दांत अडकवून फासावर त्याला लटकवू नका.एवढंच.
बघा त्या बँकेच्या धोरणात काही बदल करता येतो का?
तूर्त थांबतो !
आपला संपादक
विजय विमल सहदेवराव पोहनकर
जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ)
13 मे 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here