यंत्रणेची साथ पण मंत्रणेचा दगा ! छत्रपती संभाजी राजे…

0
22

🚩जय जिजाऊ🚩

१४ मे छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त . किल्ले पुरंदरावर घेरापुरंधर येथे इ .स .१६५७ साली छत्रपती शिवराय यांच्या राणीसरकार सईबाई यांच्या पोटी हा सूर्य तेजासम व उच्च बुद्धिमत्ता निसर्गतःच लाभलेला गोंडस राजकुमार संभाजीराजा जन्मास आला होता . कुणाचीही नजर लागावी असं रूप रंग शरीर यष्टी असलेलं बाळ , जणू काही नियतीला यांच्या बद्दल आकस – जलन निर्माण करून गेली होती . उणे पुरे दोन वर्षातच या सईबाई आईसाहेब यांना कायमच्या सोडून गेल्या होत्या . पण आजी साहेब मासाहेब जिजाऊ यांनी संभाजीराजांना पोरक होऊ दिलं नव्हतं .यांच्या करिता दुधा आई नियुक्त करण्या पासून ते यांना राजकुमार – छत्रपती बनवण्या लायक सर्वच पैलू पाडण्याचे कार्य पायाभरणी यांच्या आजी साहेबांनी मजबूत केला होता .
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात यांचे लहानपण – बालपण हे नसल्या सारखे जगले . एक राजाचा पुत्र म्हणून ऐशो- आरामातील जीवन जगण्याची जन्मताच लायकी असलेले . पण यांच्यातील बुद्धिमत्ता व अफाट साहसी वृत्ती यांना स्वराज्य रक्षक या दर्जाची उपाधी कधी लावून गेली हे कळलंच नाही ! केवळ छत्रपती चा पुत्र म्हणून शूर वीर व शक्य तितके स्तुतिपर शब्द सुमने रयत व अधिकारी उधळत असतात . पण इथे तर खरोखरच सूर्याच्या तेजा समान , पृथ्वीतील धगधगत्या लावारसा समान , साक्षात धगधगत्या अग्निनिखाऱ्या सोबत सहज लीलया खेळणार्‍या , वन्य श्वापदांना चित करण्याचे कसब असणाऱ्या , या बाळ संभाजीचे रूप प्रत्यक्ष सर्वांनी अनुभवले होते . म्हणून त्यांना छावा असे आदर युक्त संबोधले जात असे .
बालपण व यांची गट्टी कधी जमलीच नव्हती . निसर्गदत्त चाणाक्ष बुद्धिमता लाभलेल हे बाळ अल्पावधितच मराठी चा तर प्रश्नच नाही . पण सोबत संस्कृत , फारशी , इंग्रजी , उर्दू , व उत्तर हिंदुस्थानातील खडी भाषा अवगत केल्या होत्या . तसेच समुद्र किनाऱ्या वरिल डच , पोर्तुगीज सह विदेशी लुटेरे च्या बोली समजण्या इतकी विद्वत्ता मिळवलेले होते .अगदी अल्प काळातच यांनी संस्कृत भाषेचे तीन ग्रंथ लिहून काढले होते . बुधभूषण हा संस्कृत भाषेत तर नायिकाभेद ,नखशिख आणि सातसतक हे ब्रज भाषेत लिहिलेले ग्रंथ होते . बुद्धभूषण वयाच्या १४ व्या वर्षी या राजकीय धुरंदर बालकाने लिहिला होता . यात राज्य नीती पर शास्त्राद्वारे सुरुवातीला आजोबा शहाजीराजे व वडील छत्रपती शिवाजीराजे यांचे द्वारा जनहिताच्या कार्याचा गुणगौरव केलेला आहे . पहिल्या तीन अध्यायात राजनीति , राजव्यवस्था, कर्तव्य , मंत्रिमंडळ इत्यादी वर्णिले . त्यांच्या नावाने त्यांनी इतरही साहित्य निर्माण केली होती . त्यात शंभुराजे , नृपशंभू , शंभू वर्मन या नावाने निर्मिती केली होती . शृंगारपूर च्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयति महाराणी छत्रपती येसूबाई साहेब यांच्या प्रेरणेने नखशिखा हा ग्रंथ लिहिला होता .
या छाव्याच्या शूरवीरते पेक्षाही यांच्या तल्लख बुद्धिमत्ते मुळे यांच्या विरुद्ध दिवसेंदिवस स्व पक्षातीलच पण काही भ्रष्टाचारी व नियतने चांगले नसलेले लोक यांच्या बद्दल कुरापत्या करू लागली होते . मंत्रि – मंडळातील जुने जाणते पण जन्मत:च धर्माने फक्त आम्हीच श्रेष्ठ समजणारे . अशा लोकांच्या पोटात दुखू लागले होते .त्यांचे राज्य कारभारातील चुका व भ्रष्टाचार हे संभाजीराजे उघड पाडत होते . त्या मुळे त्यांना संभाजीराजांची अडचण वाटू लागली होती . थोरले महाराजांच्या साशंक निधना नंतर लगेच या कावेबाज मंडळींची काव काव सुरु झाली होती . परंतु या छाव्याचे खरे राज्य प्रस्थापित झाले होते ते रयतेवर मावळ्यांवर व सैन्य अधिकाऱ्यां वर .याला कारण यांची न्याय संगत वागणूक होती . यांनी साम्राज्य पेक्षा ही दगड-माती वर स्वामित्व मिळविण्या पेक्षा ही जिवंत लोकांच्या मनावर अधिराज्य करण्यात यश मिळविले होते . परंतु या भ्रष्ट मंत्रिमंडळातील अनाजी दत्तो व कंपूने यांचेच घरातील व रक्तातील रक्ताच्या नात्यातील यांचे साळे यांना यांचे पासून अलग करण्यात नामर्द चाली चालून या छाव्याला एकटे पाडण्यात व सहाय्य करण्यात दानवी बाजी मारली होती .
छत्रपती महाराजांचे इच्छिले स्वराज्य – रयतेचे स्वराज्य – हिंदवी स्वराज्य वाढवणे हेच फक्त या सुपुत्राने योजिले होते . त्या नुसार वतनदारी – जहागिऱ्या देणे यांनी नाकारले होते . परंतु स्वकीयांना हेच खटकले . त्यांनी या नालायक मंत्र्यांचे संगती व पंक्तीत बसून स्वराज्याचा हा धाकला धनी मुघलांकरवी जेरबंद करून दिला होता . कारण फक्त इतकेच की यांची बहुजना प्रतीची प्रीती , यांची स्व निर्णय क्षमता तसेच कुठल्याही एका धर्माचे नाही तर समस्त भारतीय रयतेचे राज्य असावे . मग त्यात जाती धर्माचा भेदभाव नसावा . अशी राज्य पद्धती अमलात आणणारा हा महान जगज्जेता – अद्वितीय योद्धा – अजय योद्धा समोरा समोर पराजित करणे या नालायकांना केव्हाही शक्य नव्हते . म्हणून फंद फितुरीने संगमेश्वरी राजकीय दौऱ्यात यांचे अंगरक्षक हमशकल सिदोजी भाडळे यांना अगोदरच अज्ञात करून ठेवले होते .
एकाच वेळी राज्याभिषेका पासून अवघ्या फक्त नऊ वर्षाच्या काळात या छाव्याने मुघल – आदिलशाही – कुतुबशाही – सिद्धी – पोर्तुगीज – डच – टोपीकर इंग्रज इत्यादी सह स्वकीय गटातील व रक्ताच्या नात्यातील हरामखोरांना सतत लढा देणारा . प्रत्येक वेळी यशश्री खेचून आणणारा . हा अजय योद्धा यांना खऱ्या अर्थाने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे असे संबोधन व्हावे .परंतु ” आयत्या बिळात नागोबा ” . या म्हणीला सार्थ ठरणारे काही धर्माचे ठेकेदार जे की , त्या संभाजीराजांच्या हयातीत त्यांना बदनाम करण्यात गुंतले होते . अमानविय व्यवहार करून त्यांना नामोहरम करण्यात धन्य मानत होते . तेच पुढे त्यांना धर्मवीर संभाजीराजे संबोधनाने त्यांच्या सोयी करिता उल्लेख करू लागले . पुन्हा त्यांच्या रयतेला व मावळ्यांना संभ्रमात टाकण्यात हे आता ही पुढेच दिसत आहेत !
तेव्हा पूर्ण यंत्रणेला यांच्यातील न्यायप्रियते मुळे हवाहवासा हा भूपति – छावा यांच्यातील बुद्धिमत्ता मुळे . वडिलांचे इच्छिले पूर्णत्वास नेण्याच्या जिद्दी मुळे काही घरचे भेदी व राज्यकारभारातील काही हलकट अधिकाऱ्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा पाई मंत्रणेच्या साठी पोषक ठरत नव्हते . यांना हटवणे सुद्धा शक्य नव्हते . तेव्हा भारतातील पूर्वापार चालत आलेली कुटिल खानदानी मंडळी चाल चालून छत्रपती संभाजीराजेंना दगाफटका देऊन स्वराज्याच्या शत्रूच्या हवाली करण्यात कट-कारस्थाने सफल झाले होते . या धूर्त कावेबाज यांनी यांचे विषयी असे काही दूषित लिखाण करून ठेवले होते की , जवळपास पुढील दोन – तिनशे वर्षे तरी यांचे लिखाण प्रमाणित मानले गेले होते . परंतु उपकार त्या सत्यशोधक इतिहास मंडळींचे की त्यांनी खरे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे लोकांच्या मनामनात पुन्हा जिवंत करण्याची व ठेवण्याचे बहुजन हिताचे कार्य केले . तेव्हा छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर संभाजी राजे नाही तर ; कर्मवीर – स्वातंत्र्यवीर – स्वराज्य रक्षक संभाजी राजे संबोधने बहुजन हिताय ठरेल .
छत्रपती संभाजी राजे पकडल्या गेले नसते तर , औरंगजेब मारला गेला असता . दिल्ली तेव्हाच स्वराज्याचा भाग झाली असती . किनारपट्टी वरील चाचे खलाशी परकीय इंग्रज तेव्हाच ठेचून बाहेर काढले गेले असते . भारताला इंग्रजांची गुलामी झेलण्याची पाळी आली नसती . पण सोबतच विदेशी तंत्रज्ञान मात्र या छत्रपतींच्या दूरदृष्टिपणा मुळे भारताला तेव्हाच मिळण्यास सुरुवात झाली असती . परंतु केवळ व्यक्तिगत स्वार्थापायी छावा संपवला . पुढे देशाला दिशा हीन करून टाकले .पण हे ही तितकेच खरे आहे की , छत्रपती देहाने जरी नसले . तरी विचाराने मात्र ते आजही अस्तित्वात आहेत . ही सृष्टी असे पर्यंत ते विचाराने प्रत्येकाच्या मनामनात वास करून राहणारच , हे त्रिकाला बाधित सत्य आहे ! छत्रपतींचे घराणे त्यांच्या जनहित कार्या मुळे अमरच राहणार आहे . तेव्हा त्यांच्या घराण्याला व त्यांचे सोबत स्वराज्य निर्मीती च्या कार्या करिता असणाऱ्या सर्व मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा .

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here