माॅं साहेब जिजाऊंचा पदर ! स्वराज्य ते मराठा साम्राज्य इतका मोठा !!

0
13

🚩जय जिजाऊ🚩

स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ कालखंड १२ जानेवारी १५९८ ते १७ जून १६७४ . १७ जून या खास त्यांच्या स्मृति दिना निमित्त .
वडील शूर वीर सरदार लखुजीराजे जाधव व आई म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदय समयी जिजाऊ जन्मल्या होत्या . सूर्यासम तेज तसेच चंद्राच्या लख्ख तेजाची माऊली चा जन्मच मुळी रयतेच्या चेहर्‍या वरील स्वतंत्र चे तेज आणण्या करता झाला होता असेच वाटते .
जिजाऊ ह्या खूप मोठ्या बापाच्या पोटी जन्माला होते त्यांना सामान्य प्रजेच्या विषयी कळवळा व विचार करण्याची काहीएक गरज नव्हती पायात काटा टोचणे तर दूरच साधी माती सुद्धा लागण्याचे कारण नव्हते अशा नावाजलेल्या जाधव घराण्यात सिंदखेडराजा येथे त्या जन्मल्या व राजवाड्यात बालपण गेले होते पण जणू काही एका विशिष्ट ध्येयासाठी त्यांचा जन्म झाला होता असे त्यांच्या जीवन फटाकडे पाहिले तर मनोमन पटते .
जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव ते त्यांच्या स्वपराक्रमाने निजामशाहीत उच्चपदस्थ सरदार म्हणजे पंधरा हजारी मनसबदार – वजीर पदा पर्यंत पोहोचले होते .या मुळे त्यांचे कडे त्या काळाच्या राजकीय लोकांचा राबता असायचा . तेव्हां चे सर्व मराठा वतनदार व परिसरा पुरते दबदबा असणारे लढवय्ये , हे पराक्रमी असले तरीही ते स्वतंत्र नव्हते . ते कुण्या तरी पतपात शाह यांचे अंकित असत . यांना , ते ज्या संस्थांचे शाह्यांचे असत . त्यांच्या मर्जी बाहेर जाता येत नसे . बरेच वेळा मना विरुद्ध जाऊन आपल्याच रयतेवर – स्वजनांवर अत्याचार अन्याय करावा लागत असे . या जाधवां कडे सुद्धा निजामशाहीतील अरेरावी व मनाविरुद्ध ची वागणूक लहानग्या जिजाऊंनी अनुभवली होती . वडिलां सोबत वावरतांना त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने त्या काळच्या विषमतेचे व मानवीय वागणुकीचे वास्तव दर्शन जाणून घेतले होते . बऱ्याच प्रसंगी त्यांनी स्वतः त्यांच्या वडिलांना इतरां चे अंकित न राहण्या बद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूचित केलेले सुद्धा दिसते .
जाधवां कडे रंगोत्सवा निमित्त जमा झालेले गणमान्य सरदार जहागीरदार वतनदार असत . पैकी एकदा वेरुळचे भोसले मालोजी हे सुद्धा आलेले होते . जिजाऊ सहज नेहमी प्रमाणे त्यांच्या पित्याच्या मांडीवर येऊन बसल्या होत्या . अशातच भोसले यांचे चिरंजीव शहाजी सुद्धा तेथे आले . तेव्हा सहज म्हणून लखोजींनी त्यांना पण जवळ घेतले . तेव्हा सहज इतरांचे पाहून या दोन लहानग्यांनी एक दुसऱ्याला गुलाल लावला . त्या वेळी उपस्थित लखोजी व मालोजी यांनी सहज जोडी किती छान शोभते ! हे बोलले .परंतु पुढे हे लग्न दोन घराण्यातील बरोबरी तोलामोलाचे नसणे . या मुळे लांबले होते . परंतु बरोबरीचा योग आला व शहाजी राजे आणि जिजाऊ जीवन साथी बनले .
जोडीदारा बाबत ह्या जाधव कन्या भरपूर नशिबवान निघाल्या होत्या . शहाजीराजे सुद्धा स्वपराक्रमाने अंकित राजा कडे वरच्या दर्जाचे सरदार ठरत गेले . परंतु जिजाऊंनी मनाशी बांधलेली गाठ शहाजीराजे कडे व्यक्त केली . कुठे तरी शहाजी राजे सुद्धा हेच मनसुबे ठेवून होते . त्यांनी अप्रत्यक्ष स्वराज्य निर्मिती करिता त्यांच्या राणी सरकारांना जिजाऊंना भरभरून दिले . वातावरण पोषक करून देणे . योग्य माणसांची निवड , सोबत शक्य तितके धन द्रव्य सुद्धा दिले होते . त्यांना प्राप्त असलेली पुणे सुपे ची जहागिरी सांभाळण्याच्या निमित्त , त्यांनी बंगलोर हुन जिजाऊ व शिवाजीराजे यांना पाठवून दिले होते . येथूनच या लखोजी कन्येचा – शहाजीराजांच्या राणी सरकारचा व बाळ शिवाजी राजे यांच्या मातोश्री , अशा तीन व्यक्तिमत्त्वाचे संगम असलेल्या एका भारतीय स्त्रीचा खरा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला होता .
जिजाऊ ह्या त्यांच्यातील अभ्यास पूर्ण व निरीक्षण करून समीक्षा करणे . या स्वभावा मुळे अगदी स्वतःच्या लेकरासह पूर्ण स्वराज्याच्या मा साहेब झाल्या होत्या . त्यांना कुणी राजमाता , कुणी जिजाऊसाहेब ,कुणी वीर माता . अशा अनेक गुण विशेषणांनी संबोधू लागले होते . समाजातील अगदी शेवटच्या स्तरातील रंजल्या-गांजल्या पासून ते शेतकरी – व्यापारी -उद्योगी – लढवय्ये मावळे – सरदार – वतनदार इत्यादी यांचे सह . ते अगदी भटके -चोर – डकेती या सर्वां सहित ; सर्व स्त्री जातीची विशेष दखल घेणे . यांना जुलमी जाचातून मुक्त करणे . तसेच प्रत्येकाच्या हृदयात व मनात स्वातंत्र्याची वृत्ती जागवणे करीत होत्या . समृद्ध व न्यायप्रिय असे देवगिरीचे यादव राज्य लयास गेल्या पासून समाजाला आलेली मरगळ . सुलतान ( बिरद – निजाम – आदिल – इमाद – कुतूब ह्या सर्व शाह्या ) व मोगल यांनी मांडलेला हैदोस व हैवानियत पाहून सामान्य जन सुलतानी व अस्मानी भीतीने दडपणा खाली जीवन जगत होते . लढवय्ये पण त्यांचे अंकित होऊन स्वतः पुरते सुरक्षित वाटून घेत होते . या सर्वांना बाहेर काढण्याची स्वातंत्र्याचा श्वास व स्वाद घेण्याचे काम या माऊलीने जणू काही विश्‍वाची माता बनून सर्वांना मोकळे केले होते .
ज्या प्रमाणे आई तिच्या बाळाला तिच्या पदरात सुरक्षित करते . त्या पदराने त्याचे अंग पुसते . त्याच पदरावर त्याला झोपवते . असा तो सामान्य आईचा पदर फक्त तिच्या कुशीत जन्मलेल्या बालका साठी असतो . पण या स्वराज्य प्रेरिकेने मात्र तिचा पदर एवढा मोठा करून ठेवला होता की ; स्वराज्याला दोन दोन छत्रपती तर दिले होते परंतु सोबतच स्वराज्यातीलच नव्हे तर यांची वानगी जेथ पर्यंत पोहोचली असेल . तेथ पर्यंत सर्वदूर यांच्या समतावादी – मानवतावादी विचारांचा पदराचा लाभ त्या त्या सर्वांनी घ्यायला सुरुवात केली होती .
स्वराज्याला ६ जून १६७४ ला छत्रपती दिल्या नंतर , पूर्ण आयुष्याशी पावलो -पावली दोन हात करीत असलेली हि माय आता मात्र थकली होती . भागली होती . कारण पूर्ण आयुष्यभर संघर्ष . शिवाजीराजे मोहिमेत बाहेर असताना त्यांचे राजकारण व कारभार सांभाळणे . नाते संबंधातील उनिवा दूनीवा जपणे . जाधव भोसले यांच्या आणीबाणी प्रसंगात कणखर व समजूतदारपणे पतीची बाजू घेऊन , खंबिरतेचा परिचय देने . संभाजीराजेंना त्यांच्या मातोश्री सईबाईच्या निधना नंतर क्षणोक्षणी मातृत्व हृदयाने जपणे . शिवाजीराजांना राजकीय पेचप्रसंगी बळ देणे व मार्गदर्शन करणे . पूर्ण तह हयात उसंत नावाची गोष्टच त्यांना माहीत नव्हती . या माऊली मुळेच पुढे स्वराज्याचे रुपांतर म्हणजे पूर्ण भारतभर मराठ्यांचे साम्राज्य उभे राहू शकले होते . म्हणजे यांचा पदर पूर्ण भारतभर व्याप्त झाला होता . तेव्हा आयुष्याच्या शरीराच्या मर्यादा आड आल्या असे म्हणा किंवा करारीपणा ने जीवन जगण्याची वृत्ती म्हणा . शिवराज्याभिषेक झाल्या नंतर जणू काही आपली जबाबदारी आता संपली . म्हणून ठरवून इतरांना त्यांचे मोकळे जीवन जगण्या करता आपण बाजूला होणे . अशाच अविर्भावात शारीरिक आजाराचे कारण देत . ही माऊली १७ जून १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी स्थित पाचाड येथे , परत न येण्याच्या मार्गावर निघून गेल्यात . अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास शतकोटी प्रणाम व असंख्य मानाचे मुजरे !

अशोकराव घनोकार
नांदुरा
९७६३०५५०७१ .

जय महाराष्ट्र – जय हिंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here