करा योग ! रहा निरोग !! अंर्तबाह्य शरीराचे यम-नियमाचे सोहळे म्हणजे योग !!!

0
74

🚩जय जिजाऊ🚩

सुखाचा , ऐशो आरामाचा वियोग जो ( सहन ) करू शकतो . तो जिव खऱ्या अर्थाने योग करू शकतो . या पृथ्वीतलावर मानवा सहित खुप सारे जिव आहेत . सर्वांचे जिवन जगण्याचे नियम निसर्गतः ठरलेले आहेत . अर्थात निसर्गाने सर्वांना जगण्याच्या मर्यादा – चौकट निश्चित करून दिलेली आहे . मानव सोडुन तरी इतर सर्व जिवमात्र या नैसर्गिक मर्यादांचे चौकटींचे उल्लंघन न करता जीवन जगतात , जगत आलेले आहेत , पुढेही जगत राहतील . पूर्ण जीवसृष्टीत मानव हा बुद्धीने विकसित झालेला प्राणी ; नको त्या ठिकाणी बुद्धीच्या वापराचा अतिरेक करून . अति सुखाच्या अधीन जाण्याच्या हव्यासा पायी नैसर्गिक जीवना पासून दूर दूर जात ; आज दिसत असलेले सुखाची साधने तसेच कुठल्याही गोष्टी कमी शक्ती व श्रमात मिळविण्याच्या अनैसर्गिक नियमांचे कचाट्यात जाऊन स्वतःची फसगत करून बसला आहे .
जसा जीव जन्माला येतो , तसे त्यांचे आयुर्मान ठरलेले आहे .वयाच्या नुसार व दैनंदिन शारीरिक – मानसिक ऱ्हासापायी शरीरात उत्पन्न होणाऱ्या कमतरता – त्रुटी – रोग हे येणारच . ठरलेले खानपान दैनंदिन जीवनातील घडामोडी ह्या जरी ठरलेले असल्या ; तरी सुद्धा काही वेळा नैसर्गिक कारणांनी , तर काही वेळा मानवाच्या अति हुशारी मुळे सुद्धा या मध्ये झालेली गडबड – झालेला गोंधळ हा शरीरांतर्गत बदल घडवून आणतो . ज्या प्रमाणे बाह्य आघाताने शरीराला बाहेरून इजा झाल्यास जखम होणे , खरचटणे , काहीवेळा अस्थिभंग होणे . हे प्रकार ठळकपणे बाह्य लक्षणां मुळे लागलीच लक्षात येतात व त्यावर उपाय योजना करून नियंत्रण मिळवता येते . परंतु शरीरांतर्गत तयार होत जाणाऱ्या कमजोरी किंवा आजार हे सहसा लवकर लक्षात येत नाहीत . वा तज्ञ लोकांच्या द्वारा त्यांचे निदान झाल्यास ते लक्षात येतात . परंतु बरेच वेळा असे निदान करून घेण्याचे सुद्धा जास्त वेळ घालवल्या मुळे उशीर झालेला असतो . या होणाऱ्या उशिरा मुळे शरीराच्या आतील बिघडलेली रचना पूर्ववत करणे जिकरीचे किंवा हाता बाहेर गेलेले प्रकरण असे स्वरूप घेते . प्रत्येक जीव हा निसर्गाचा घटक आहे . निसर्ग नियमाचे अधीन राहूनच त्याने त्याचा कार्यकाल पूर्ण करायचा असतो . हा या जगाचा एक अलिखित – सक्त नियम आहे .ज्या मध्ये चुकीला माफी नाही . निसर्गात भ्रष्टाचार खपवून घेतला जात नाही . परंतु या निसर्गातील एकमेव प्राणी , मानव हा त्याच्या अति हुशारी मुळे व जास्तीत जास्त सुख मिळावे या करिता यंत्र तंत्राच्या साह्याने दैनंदिन गोष्टींची पूर्तता करून घेण्याच्या सुखलोलुप वृत्ती मुळे , त्याची नैसर्गिक प्रवृत्ती गमावून बसला आहे . निसर्गातील कठोर नियमां मुळे अशा व्यक्तींना आजार जडतो . व्याधीने ग्रासला जातो .
भारतातीलच अति पूर्वी होऊन गेलेले संशोधक ऋषी यांनी शारीरिक उत्पन्न झालेल्या व्याधी करिता काही आयुर्वेदिक वनस्पती औषधी चे संशोधन केलेले आहे . योग्य वेळी योग्य मात्रा मध्ये यांचे ग्रहण केल्यास रोग्यांना इच्छित फलद्रूपता प्राप्त होऊ शकते . अशा दर्जेदार वनस्पती औषधी अति प्राचीन काळा पासूनच भारतीय संशोधकांनी संशोधित केलेल्या आहेत . परंतु फक्त औषधी ने आजार दुरुस्त करणे म्हणजे वेळी अवेळी आलेली शारीरिक दुर्बलता आणिबाणी वर मात करणे असे होते . तेव्हा इतर पूर्णवेळ तहहयात शारीरिक कमजोरी येऊच नये किंवा असल्यासही त्यांना सौम्यत्व प्राप्त करण्या करिता ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहेत .त्यांना या आयुर्वेद तज्ञ ऋषींनी ” योग “, हे नामकरण केलेले आहे . विश्वातील पंच महाशक्ती यांचा अंश म्हणजे या जीवसृष्टीतील जीव ; पैकी आपण मानव सुद्धा ! तेव्हा योग पद्धती मध्ये या पंच महाशक्ती च्या अधीन राहून शरीरांतर्गत यम नियमाचे सोहळे करून घेणे . यालाच योग असे म्हणावे लागेल . योग म्हणजे श्वासोश्वासावर शरीराला सशक्त करण्याचे तंत्र . योग म्हणजे प्राणायम , भश्रीका , कपालभाती , अनुलोम – विलोम असे काही ठळक नावे सांगता येतील . सोबतच शारीरिक बाह्य कसरती , दंड बैठका , सूर्यनमस्कार ,कवायती , पायी चालणे , धावणे , पोहणे , इत्यादी . तसेच योग म्हणजे काही तत्त्वांच्या अधीन राहून . मार्गदर्शक लोकांच्या मार्गदर्शनात राहून , स्वतःवर करावयाचे योग्य प्रयोग होत . ज्या प्रमाणे जीव दशेतील जीवाला जगण्या करिता अन्न व प्राणवायू नित्य व सातत्याने आवश्यक आहे . अगदी त्याच प्रमाणे योग सुद्धा नित्य सातत्य ठेवून करायचा , निरोगी जिवन जगण्याचा राज मार्ग आहे . फक्त काही दिवस किंवा फक्त जागतिक योग दिवस आहे म्हणून योग करून चालत नाही . तर अगदी दररोजचा ठरलेला वेळ योगा प्राणायाम – शारीरिक कसरती – हालचाली – सराव या करिता राखीव वेळ देणारा व्यक्तीच या विषयुक्त वातावरणात व विष तत्वांनी ओतप्रोत भरलेल्या अन्न घटकाचे सेवन करणाऱ्या मानवास अत्यंत अत्यंत आवश्यक व गरजेचे ठरत आहे .
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून इसवी सन २०१५ पासून साजरा केला जाऊ लागला . भारताचे माननीय प्रधानमंत्री योग पुरुष व युग पुरुष म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही . असे श्रीमान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जागतिक परिषदेत इसवी सन २०१४ डिसेंबर ला मांडलेला ठराव , इ स . २१ जून २०१५ पासून जागतिक योग दिन म्हणून मान्यता पावला . भारता पेक्षा सर्वच बाबतीत बलाढ्य असलेली मोठी राष्ट्र सुद्धा भारतीय ऋषि द्वारा पुरस्कृत केला गेलेला योग मानवी जीवनाचे किती अमूल्य मूल्यतत्व जोपासतो . या बद्दल त्यांना पूरेपूर खात्री पटल्या मूळे त्यांनी भारतीय योगाला जागतिक स्तरावर स्विकारले आहे .
तेव्हा या २१ जून पासून पुन्हा नव्याने निर्धार करूया . दररोज नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ योगा प्राणायाम व्यायाम – चालणे – सायकलिंग करून स्वतःला तंदुरुस्त ठेवून हा आपला भारत सशक्त व तंदुरुस्त नागरिकांचा भारत करूया हा मनोमन संकल्प करून आळसाला झटकून टाकुया .
श्रीमद् भगवद्गीतेत भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलेला श्लोक ,” योगः कर्मसु कौशलं “, याचे अनुकरण करणारा खऱ्या अर्थाने योगी पुरुष ठरतो . (विस्तार भयास्तव या श्लोकाचे विश्लेषण टाळतो . )

जय महाराष्ट्र – जय हिंद .

अशोकराव घनोकार
नांदुरा .
९७६३०५५०७१ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here