ब्रिटिशांनीं ‘अपराधी’ शिक्का मारलेल्या समाजाला स्वातंत्र्यानंतरही नागरी अधिकार मिळाले नाहीत ! भटक्या- विमुक्तासाठीच्या कार्यकर्यांची खंत !!ग्रामायण तर्फे चार संस्थांना दोन लाख रुपयांची मदत !!!

0
23

नागपूर जिल्हा प्रतिनिधी, जगदिश न्युज

ब्रिटिशांनीं ‘अपराधी जमात’ म्हणून शिक्का मारलेल्या पारधी समाजाला स्वातंत्र्यानंतरही त्यांचे नागरी अधिकार मिळाले नाहीत. विकासाच्या प्रक्रियेत ते अजूनही फार मागे आहेत, अशी खंत पारधी व भटक्या – विमुक्त समाजातील व्यक्तींनी व या समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ग्रामायणच्या ‘संवेदना, एक हात मदती’चा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. ते ग्रामायण नागपूर या समाजसेवी संस्थेने भटक्या व विमुक्त समाजाच्या विकासाठी काम करणाऱ्या संस्थांना आवश्यक साहित्य वितरित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ग्रामायणचे अध्यक्ष श्री. अनिल सांबरे यांच्या अध्यक्षतेत दीक्षाभूमीजवळील अंध विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उद्योजक बंधू प्रशांत आणि श्रीकांत धोंडरीकर, सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलचे संचालक प्रवीण तिवारी, पारधी समाजातील कार्यकर्ते सुभाष भोसले, ग्रामायणचे सचिव संजय सराफ मंचावर उपस्थित होते.


अतिथी मनोगत
समाजातील आर्थिक दुर्बल व मागास समाजाला आर्थिक व वस्तूंची मदत करण्यासोबत त्यांच्या भागात उपलब्ध असलेल्या साधन व नैसर्गिक फळांपासून उद्योग सुरू करण्याचे तंत्रज्ञान व आवश्यक साधने उपलब्ध करून दिलीत तर ते रोजगार मिळून आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील, असे मत धोंडरीकर बंधूंनी व्यक्त केले व यासाठी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
सुभाष भोसले यांनी आजही कायम असलेल्या पारधी समाजाच्या दयनीय स्थितीचे वर्णन केले. विकासाच्या घोडदौडीत निसर्गापासून फारकत घेऊ नका; शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या नादात लोकांना रासायनिक खातांनीं उत्पादित विषारी अन्न – फळे खाऊ घालू नका, असे आवाहन केले. मानवाच्या जीवनात वनस्पती-जंगलाचे महत्त्व विशद केले.

श्री. प्रवीण तिवारी ग्रामायणच्या मदतीच्या प्रकल्पांना आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.
पारधी पदवीधर युवकाचे मनोगत

पारधी समाजातील पदवीधर युवक कार्तिक मनोगत व्यक्त करताना म्हणाला की, आमचा समाज आजही विकासात खूप मागे आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सोईंपासून खूप दूर आहे. समाजातील मागास रूढी-परंपरा यात गुरफटला आहे. मला योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणून मी सुधारलो. समाजाची अशीच मदत मिळाली तर आमच्या समाजातील इतरही लोक सुधारतील; त्यांच्यातही क्षमता आहे. यासाठी विकसित समाजाने आम्हाला आपले समजून मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. समाजाने आमच्याबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाकावेत, आम्हालाही विकासाची संधी द्यावी.
विविध साहित्य रूपाने मदत
भंडारा येथील भटके – विमुक्त कल्याणकारी संस्था, अमरावती येथील प्रज्ञा प्रबोधिनी आणि दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या विवेकानंद छात्रावास व नागपूर येथील सोनुताई अग्निहोत्री मुक बधीर विद्यालय या संस्थांना समाजातील व्यक्तींकडूनं मिळालेल्या सज्ञयोगातून विद्यार्थ्यांसाठी सायकली, साउंड सिस्टीम, इन्व्हर्टर व्हाईट बोर्ड नोटीस बोर्ड आदि साहित्य देण्यात आले. यासाठी सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. जमलेल्या रकमेतून दीड लाख रुपयांच्या वस्तू आणि दोन संस्थांना पन्नास हजार रुपयाचे चेक ने मदत यावेळी करण्यात आली.
मदत प्राप्त संस्थांतर्फे सर्वश्री श्रीकांत तिजारे , अविनाश देशपांडे, व विजय कद्रे यांनी मनोगत व्यक्त केले आपापल्या कामाची थोडक्यात माहिती दिली.व ग्रामायणने भटके व विमुक्त समाजासाठी दिलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त करताना समाजाने मागास वर्गाच्या विकासात सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
समयोचित गीत श्री. किशोर पंडित यांनी व पसायदान अड. रंजना पुरणकर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री अलंकरी, संचालन सुषमा देशपांडे – मुलमुले आणि आभार प्रदर्शन श्री. नंदकुमार दीक्षित यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here