शालेय विद्यार्थ्यांचा लाल परीला ,,जोर का धक्का धिरे से ! भंगार बसेसचा विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास !!

0
24

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी,खामगाव

विद्यार्थ्यांना घेऊन खामगाव बस स्थानकावरून जलंबकडे जाणारी खामगाव – भेंडवळ ही बस 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान वाडी गावाजवळ अचानक बंद पडल्यामुळे बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना खाली उतरून या नादुरुस्त बसला धक्का द्यावा लागला. धक्का देऊनही बस सुरू न झाल्याने अखेर सदर बसला दुरुस्ती कामी डेपोमध्ये नेण्यात आले. परिवहन मंडळाच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर राज्याच्या परिवहन मंडळाला लागलेल्या नादुरुस्त बसेसचे ग्रहण केव्हा दूर होणार? असा प्रश्न प्रवाशांकडून या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन तळागाळातील नागरिकांच्या सोयीकरिता तसेच त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचविण्याकरिता सेवा देणारे परिवहन मंडळाच्या बसेसची अवस्था फारच भंगार झाल्याचे निदर्शनास येत आहे. भंगार बसेस मुळे प्रवाशांच्या जीवाला अनेकदा धोका निर्माण झाल्याचेही प्रसंग समोर आलेले आहे मागील दहा वर्षा अगोदर खामगाव वरून निघालेली बुलढाणा – पातुर्डा ही बस भंगार अवस्थेमुळे संग्रामपूर नजीक असलेल्या पूर्णा नदीवरील खिरोडा पुलावरून नदीमध्ये कोसळली होती. या भयंकर दुर्दैवी अपघातामध्ये तब्बल 20 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. असे असताना सुद्धा परिवहन विभागाकडून अद्यापही भंगार बसेसचा बंदोबस्त करण्यात आलेला नसून प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता सर्रासपणे रस्त्यावर या भंगार बसेस धावताना नेहमीच दिसून येत आहेत. तर अनेकदा सदर बसेस मार्गातच अडगळून बंद पडतानाही दिसून आले आहेत. अशा प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाचा तसेच मानसिक आणि आर्थिक त्रासाचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी खामगाव बस स्थानकामधून शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना घेऊन निघालेले बस क्रमांक एम एच 40 – 8782 हे जलंब नाक्यावरून वाडी मार्गे भेंडवळकडे जाताना वाडी गावाजवळील मुलींच्या वस्तीगृहासमोर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. गावाला पोहोचण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना घरी जाण्याकरिता विलंब होत असल्याने बस मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी खाली उतरून चक्क लालपरीला धक्का देऊन बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस काही सुरू झाली नाही. त्यामुळे अखेर सदर बसला खामगाव आगारातील टेक्निकल विभागाने येऊन दुरुस्तीच्या कामाकरिता डेपोमध्ये घेऊन गेले. मात्र या सर्व प्रकारांमध्ये सदर नादुरुस्त बस मध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थी आणि प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला होता.

बुलढाणा परिवहन विभागाला नव्या बसेसची प्रतीक्षाच !
राज्यातील परिवहन मंडळाकडून नव्या बसेसची खरेदी करण्यात आल्याचे समजले आहे. मात्र अद्याप बुलढाणा परिवहन मंडळाला एकही नवीन बस प्राप्त झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, चिखली, मेहकर, मलकापूर, नांदुरा या आगारांमध्ये सुद्धा भंगार बसेसची संख्या वाढली असून या आजारांनाही नवीन बसेसची प्रतीक्षा लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here