
गिरीश पळसोदकर,खामगाव – संपुर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षीपासून प्रथमताच येथील पत्रकार बांधवांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. खामगाव पत्रकार गणेश मंडळाच्या वतीने स्थानिक पत्रकार भवन येथे गणरायाची स्थापना केली जाणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या गणेशोत्सवाची सुरूवात १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक पत्रकार भवन येथे गणरायाची स्थापना करून करण्यात येईल. विशेष म्हणजे पत्रकाराचे रुपात ही गणरायाची मूर्ती साकारण्यात आली आहे. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी पत्रकार भवन परिसरात दुपारी १२ वाजता वृक्षारोपण, २१ सप्टेबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांसाठी जलंब रोडवरील गोकुल नगरातील अग्रवाल हॉस्पिटल येथे अस्थिरोग तपासणी निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.नितीश अग्रवाल हे रूग्ण तपासणी करून उपचार, सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बि.एम.डी टेस्ट म्हणजेच हाडाच्या ठिसूळतेची तपासणी मशिनव्दारे मोफत करण्यात येणार आहे. तर एक्स-रे शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नागरिकांसाठी स्थानिक नांदुरा रोडवरील गायकवाड हॉस्पिटल समोरील दाणे हॉस्पिटल येथे मुळव्याध, भगंदर व त्वचाविकार निशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डॉ.प्रभाकर दाणे व डॉ.शुभांगी दाणे हे रूग्ण तपासणी करतील. यानंतर दुपारी ४ वाजता स्थानिक पत्रकार भवन येथे जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तर २४ सप्टेंबर दुपारी ४ गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदानातील विहिरीमध्ये विसर्जन होणार आहे. तरी आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पत्रकार बांधवांनी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव पत्रकार गणेश उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.